आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात ; प्राणायम करून पटवून दिले योगाचे महत्त्व

Foto


औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शहरात विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगा करण्यात आला. यावेळी प्राणायम करून योगाचे महत्त्व पटवून देत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

पंतजली योग समितीच्या वतीने क्रीडा संकुल, एन-6 परिसर हर्सूल कारागृह आणि सिडको एन 2 क्रीडा मैदानावर योगाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या शिबिरात जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद, महापौर नंदकुमार घोडेलेसह आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुभाष वेदपाठक, राम बारस्कर, आरती पाल, कांचन वसलेकर यांना योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी सामाजिक संघटना, क्रीडा भारती, शाळांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. 

याशिवाय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हर्सूल कारागृह आणि सिडको एन-2 येथील क्रीडा मैदानावर प्रकाश तुपे,  कैलास पवार यांनी मार्गदर्शन करून योगाचे महत्त्व पटवून दिले. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सिडकोतील ललित कला भवन तसेच सिद्धार्थ गार्डन  व इतर भागातही योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.

शहराबरोबर जिल्ह्यातही योगदिन उत्साहात
स पंतजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग शिबिर घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील शंभर शाळा आणि जिल्ह्यातील दोनशे शाळांमध्ये योग शिबिर घेण्यात आले. यावेळी निरोगी आरोग्य राहण्यासाठी प्रत्येकाने योगा करावा, असे आवाहन करण्यात आले. याशिवाय प्रतिदिन योगा करू,असा संकल्पही केला. यासाठी समितीचे अध्यक्ष शिवाजीराव कवडे, महिला पंतजली योग समितीच्या अंजली आयाचित, युवा भारत पंतजली योग समिती कैलास पवार, शैलेश मतनेकर, राम बारस्कर, रमाकांत देसाई, श्रीराम वाघ, मोना राजपूत, संतोष राजपूत, सुभाष मालाणीसह आदींनी सहकार्य केले.